बहुमोल जीवन
मनासारख्रे सारे काही जीवनात या घडते का ?
फुले निखळुनी पडती, तरीही झाड सारखे झडते का ?
भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला
गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला
काटे देते म्हणुनी लतिका मातीवरती चिडते का ?
मनासारख्रे सारे काही जीवनात या घडते का ?
वसंत येतो, निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला
पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला
देह जळाला म्हणुनी धरणी एकसारखी रडते का ? मनासारख्रे सारे काही जीवनात या घडते का ?
रोज नभाचे रंग बदलती, घन दाटुनी येतात तरी
निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी
अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का ?
मनासारख्रे सारे काही जीवनात या घडते का ?
सुखदुःखाची उनसावली येते, जाते, राग नको
संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको
बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का ?
मनासारख्रे सारे काही जीवनात या घडते का ?